भिगवणला होणार संस्थात्मक विलगिकरणाची सोय ; आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर

भिगवण,स्वराज्य वार्ता टीम

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भिगवणमध्ये संस्थात्मक विलिनीकरणाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच तानाजी वायसे यांनी दिली. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना बाबतच्या अडचणी व सर्व समस्या त्यांना सांगितल्या व तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.

बैठकीत गटविकास अधिकारी कोणाचेही एकूण घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. मात्र बैठकीतील सदस्यांनी बोलायला सुरुवात करताच तेही संतापले आणि मोठ्या आवाजात बोलू लागले. यावेळी भिगवण दर्शनचे संपादक प्रा. तुषार क्षीरसागर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना फोन करून याबाबत सर्व माहिती दिली आहे.

संस्थात्मक विलागिकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, उपविभागीय अधिकारी बारामती यांचे आदेशान्वये येथील तारादेवी लॉन्स, श्याम गार्डन व आदर्श विद्या मंदिर येथे संस्थात्मक विलगीकरणाची सोय होणार आहे. त्यामध्ये चाचणीसाठी आलेले व्यक्ती आणि पॉझिटिव्ह रुग्ण असे विभाग करण्यात येणार आहेत. चाचणीसाठी आलेले रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत विलगिकरणात ठेवले जाणार आहेत, तसेच पॉझिटिव्ह असलेले परंतु कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले रुग्णही येथेच राहणार आहेत. संस्थात्मक विलगिकरणाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे जीवन माने यांनी सांगितले.

या बैठकीसाठी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच प्रतिनिधी पिंटू शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी, तलाठी धनंजय गाडेकर, केंद्र प्रमुख नानासाहेब दराडे उपस्थित होते.

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !