इंदापूरमधील शिक्षक दाम्पत्याने ज्ञानदानाबरोबरच केले प्लाझ्मादान

इंदापूर (प्रा.आदेश बनकर):
इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयातील श्री. सुनिल मोहिते व सौ. रोहिणी मोहिते या शिक्षक दांपत्याने प्लाझ्मा दान करून ज्ञानदान बरोबरच आपले एक सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे.


विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे श्री. मोहिते हे इंदापूर सायकलचे अध्यक्ष व इंदापूर रोटरी क्लबचे खजिनदार म्हणून कार्यरत असून त्यांनी सपत्नीक प्लाझ्मा दान करून एक नवीन आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. मोहिते दांपत्य रयत शिक्षण संस्थेमध्ये गेले 19 वर्षे विद्यादानाचे कार्य करत आहेत.

अनेक सामाजिक,सांस्कृतिक,आरोग्यविषयक, पर्यावरण पूरक उपक्रमात ते स्वतःहून सहभागी होत असतात. मागील महिन्यामध्ये कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर दोघांनीही प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.आपण दान केलेला प्लाझ्मा चार गरजू व्यक्तींना जीवनदान देणार आहे याचा खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील कोरोना मुक्त व्यक्तींनी अशा चांगल्या कार्यात पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुक्ताई ब्लड बँकेचे प्रमुख अविनाश ननवरे यांनी उभयतांचे आभार व्यक्त केले व इतरांनीही यांचा आदर्श घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांना याचा उपयोग होऊन ते लवकर बरे होतील असे सांगितले.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !